चित्कळेचा स्पर्श । ९
कालवावा, हो स्त्रोतच खंडून टाकावा म्हणजे भारतीय जन मरगळून जातील, त्यांच्या शक्ति वठून जातील आणि मग आपसया ते शरीराने व तसेच मनाने, प्रज्ञेने व भावनेनेहि आपले गुलाम होतील, आपल्यापुढे लाचारपणें नमतील, अशी राज्यकर्त्यांच्या मनाची निश्चिति झाली होती; आणि म्हणूनच त्या धोरणाने पावले टाकण्यास त्यांनी प्रारंभ केला होता.
अस्मिता कोमेजली
हिंदी जनांना ते सांगू लागले की, तुमच्या इतिहासांत, तुमच्या प्राचीन परंपरेंत, तुमच्या संस्कृतींत उज्ज्वल, अभिमानास्पद, दिव्य, असें कांही नाही. रामायण, गीता, वेद, उपनिषदें, महाभारत यांचा तुम्ही अभिमान धरता, पण हे सर्व ग्रंथ म्हणजे प्राधान्याने होमरचें इलियड महाकाव्य, ख्रिश्चनांचें बायबल इत्यादि पाश्चात्य ग्रंथांची भाषांतरें किंवा रूपांतरें आहेत. हीं आपलीं मतें सिद्ध करण्यासाठी इतिहास, भाषाशास्त्र, प्राचीन प्रवाशांचे ग्रंथ, यांचे असे कांही भरभक्कम आधार पाश्चात्त्य पंडितांनी उभे केले की, क्षणभर भारतीय जन मूढ होऊन गेले. विद्वत्तेच्या क्षेत्रांतील असल्या शस्त्रास्त्रांचा त्यांना गंध सुद्धा नव्हता. भाषाशास्त्रीय पुराव्यांनी, व्युत्पत्तीच्या साह्याने एखाद्या ग्रंथाचा काळ ठरवावयाचा असतो, त्याचें पौर्वापर्य निश्चित करावयाचें असतें, तो अस्सल की नक्कल हें त्यांवरून निर्णित करतां येतें याची भारतीयांना स्वप्नांत सुद्धा कल्पना नव्हती. भाषाशास्त्राप्रमाणे इतिहास ही विद्याहि हिंदी लोकांना अगम्यच होती. भाषाशास्त्राचा अभ्यास येथे निदान प्राचीन काळी तरी झाला होता; पण इतिहास- विद्या पहिल्यापासूनच येथे शून्य होती. त्यामुळे रणांगणांतील आक्रमणाच्या वेळीं पाश्चात्यांच्या नव्या, भारी शस्त्रास्त्रांमुळे व युद्धविद्येमुळे जसे हिंदी लोक पराभूत झाले तसेच या विद्वत्तेच्या क्षेत्रांतहि या सर्वस्वी नव्या शस्त्रास्त्रांपुढे ते प्रारंभी निष्प्रभ झाले, आणि त्यांची अस्मिता कोमेजून गेली.
पाश्चात्त्यांचे प्रलाप
डॉ. लारिन्सर या पंडिताने श्रीमद्भगवद्गीतेवर एक प्रबंध लिहून गीता ही बायबलच्या आधारे लिहिलेली असून, ती ख्रिस्ती शकाच्या आठव्या शतकाच्या सुमारास लिहिली गेली आहे, असें मत मांडलें. गीतेचा बारावा अध्याय व जॉनचें शुभवर्तमान यांतील बऱ्याच कल्पना सारख्या आहेत, हा त्याला पुरावा. प्रो. विल्सन यांनी याच मताचा अनुवाद करून गीतेंतील सोळाव्या अध्यायांत बौद्धांचा स्पष्ट उल्लेख आहे, असा पुरावा दिला आहे. डॉ. वेबर यांनी असा सिद्धान्त मांडला की, वाल्मीकीने आपलें रामायण बौद्धांच्या दशरथ- जातकाच्या आधारें लिहिलें असून, त्यांत ग्रीक महाकवि होमर याच्या इलियडची मदत घेतली आहे. याशिवाय त्याने असेंहि विधान केलें की, रामायण हें ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांत रचलें गेलें आहे. हे ग्रंथांविषयी झालें. वेरूळच्या लेण्यांविषयी काय ? तीं तर बाहेरून चोरून