८ । केसरीची त्रिमूर्ति
लेखकांत क्वचितच आढळते. निबंधमालेंतील विस्तृत, विद्वत्तापूर्ण चित्ताकर्षक आणि प्रभावी लेखांच्या योगाने हा मनु पालटला. महाराष्ट्रांत स्वदेशाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली. प्रत्येक विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. उदयोन्मुख लेखकांना नवी दृष्टि मिळाली, त्यांच्यांत आत्मविश्वास उत्पन्न झाला आणि मराठी गद्य-वाङ्मयवैभव वाढीला लागलें."
'स्वदेशाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली' याला महत्त्व आहे. ती प्रज्वलित झाली की सर्वच क्षेत्रांत- केवळ वाङ्मयांतच नव्हे- मानवी कर्तृत्व फुलारून येतें. प्रारंभीं यांचीं जीं उदाहरणे दिली आहेत तीं मानवी कर्तृत्वाच्या सर्व क्षेत्रांतलीं आहेत. त्यांचे श्रेय सर्व त्या स्वदेशाभिमानाकडे आणि प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे तो प्रज्वलित करणाऱ्याकडे जाते.
यावर प्रश्न असा येतो की, शास्त्रीबुवांच्या लेखणींत असें काय अलौकिक होतें, की ज्यामुळे ही प्रेरक शक्ति तिच्या ठायीं निर्माण झाली ? त्या आधीच्या कालखंडांत महाराष्ट्रांतील कर्तृत्वाला अडसर बसेल असें काय घडलें होतें ? येथल्या जनांची गुणसंपदा आंतल्या आंत थिजून जावी, गोठून जावी असें काय वातावरण येथे निर्माण झालें होतें ? आणि तो अडसर दूर व्हावा, तें वातावरण नष्ट होऊन त्या गुणसंपदेला फुलोरा यावा अशी कोणती किमया निबंधमालेने केली ?
तेजोभंग
स्वत्व-जागृति, स्वाभिमान-चेतना, अहंप्रबोधन ही ती किमया होय. पेशवाई नष्ट होऊन इंग्रजांचें राज्य येथे प्रस्थापित झाल्यापासून इंग्रज राज्यकर्ते, इंग्रज व इतर पाश्चात्त्य पंडित आणि इंग्रज मिशनरी यांनी येथल्या जनतेचा तेजोभंग करून तिचें स्वत्व नष्ट करावें, तिचा स्वाभिमान शून्यवत् करून तिच्या ठायीं असलेली स्वातंत्र्याची ऊर्मि जीवहीन, बलहीन, करून टाकावी असे जाणूनबुजून प्रयत्न चालविले होते. इंग्रज हा चतुर राजकारणी होता, प्रज्ञासंपन्न मुत्सद्दी होता, आणि मानवी मनांतील अंतःप्रेरणांचा जाणकार अभ्यासी होता. रणामध्ये जिंकलेले हे मराठे केवळ देहाने जिंकले गेले आहेत, त्यांची मनेंहि गुलाम करून टाकल्यावांचून आपले राज्य येथे दीर्घकाळ चालणार नाही, हें तो जाणून होता. म्हणून राज्य स्थिर होताच, किंवा त्याच्या आधीपासूनच मराठ्यांच्या व भारतीयांच्या मनःशक्ति क्षीणजीव करून टाकण्याच्या उद्योगास तो लागला.
मूळ प्रेरणा
आपली प्राचीन परंपरा, आपली संस्कृति, आपला पूर्व दिव्य इतिहास, आपल्या पूर्वजांचे पराक्रम, आपल्या पूर्वसूरींची प्रज्ञा, बुद्धिमत्ता, आपला धर्म, आपली भाषा यांचा अभिमान ही मानवी कर्तृत्वाची मूळ प्रेरणा आहे, त्याच्या पराक्रमाची ती गंगोत्री आहे, त्याच्या जीवशक्तीचा तो मूलस्रोत आहे हें इंग्रजांनी व पाश्चात्त्य पंडितांनी जाणलें होतें. त्यामुळे या मुळावरच घाव घालावा, या गंगोत्रींतच विषार