पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/४१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


नरेंद्र लोळे यांनी आपली जागा प्रबोधिनीच्या महाराष्ट्रभरातून आलेल्या मुलींच्या शिबिरासाठी उपलब्ध करून दिली.

 यामधे कुसगावच्या रामराव चौधरींचा उल्लेख नक्कीच केला पाहिजे. त्यांचा आणि प्रबोधिनीचा संबंध १९७९ सालापासून यंत्रशाळेमुळे आला. त्यांनी तिथे नोकरी केली. बाहेर पडून स्वत:चा उद्योग केला. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे गावासाठी अनेक प्रकारे मदत केली. त्यांनी ८५ साली गावात दारुबंदी कार्यक्रमात, गणेशोत्सव आयोजनात पुढाकार घेतला. गावात बचतगट सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले. गावच्या पाणलोट क्षेत्र समितीचे ते अध्यक्ष होते. गावासाठीच्या बालवाडीला चालना दिली. वर्षभर शिक्षिकेचा पगार त्यांनी दिला. एकीकडे त्यांचा दुधाचा, डंपरचा व्यवसाय करण्याचे प्रयत्न चालूच होते. त्यासाठी त्यांनी कर्ज उचललं. पण त्याहूनही त्यांनी इतर उपक्रमांमध्ये जो सहभाग घेतला तो जास्त मोलाचा आहे.

 समारोप

 काही निरीक्षणे :

 गावामध्ये या लोकांना भेटत असताना, त्यांचं काम बघत असताना पदोपदी अनेक गोष्टी जाणवत होत्या, समजत होत्या. त्यातून काही विचारही सुरू झाला. इतक्या वाटचालीनंतर जरा थांबून पुन: निरीक्षण करण्याची गरज वाटली. म्हणूनच या उद्योजकांच्या अनुभवाचा हा आढावा.

 आर्थिक हतबलता -

 ग्रामीण भागामध्ये फिरताना एक गोष्ट सतत जाणवत होती ती म्हणजे आर्थिक चणचण. हातात रोख पैसा सातत्याने येत रहाणं हे इथे तितकं सोपं नाही. पण त्याची गरज तर सर्वांना आहे. शहरामध्ये त्यामानाने पैसा मिळवण्यासाठी जास्त वाटा, जास्त संधी-सुविधा उपलब्ध असतात. त्या सर्व सोयी-सुविधा हव्या त्या प्रमाणात ग्रामीण भागांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून इथे संधी निर्माण करणं जास्त गरजेचं ठरतं. अर्थातच ही गरज संस्थने लक्षात घेतली आणि त्यादृष्टीनी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले.

उद्योग सुरू करणं सोपं असतं, चालवणं अवघड असतं    ३६