पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/३२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


घरच्यासाठी घेतलेल्या या छोट्या यंत्रावर मग गावातल्या इतरांचीही दळणं व्हायला लागली अर्थात उद्योग म्हणून. घरची शेती आणि म्हशी होत्याच. मग त्यातही काही वाढ करावी, सुधारणा करावी असं वाटायला लागलं. त्याचंही थोडं प्रशिक्षण घेऊन दुधाचा व्यवसाय सुरू केला, भांडवल उभं करून आणखी म्हशी घेतल्या आणि आज दिवसाला ४० लिटर दूध विकलं जातं.

 या शिवाय गावात रोजंदारीवर मोठे काम सुरू असताना तिथल्या लोकांना सावित्राबाईंनी जेवायलाही घातलं आहे. त्यांना जागा भाड्याने देणे आणि खानावळ असेही उद्योग थोड्या काळासाठी त्यांनी केले आहेत.

 प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य -

 गिरणीची चक्की विकत घेताना १०,००० रुपये कमी पडत होते. ती रक्कम बचत गटामार्फत सावित्राबाईंना मिळाली. आणि भर घालून त्या चक्की घेऊ शकल्या.वेगवेगळ्या उद्योगांना आत्तापर्यंत त्यांनी गटातून ६०,००० रुपये अर्थसहाय्य घेतले तर इतर व्यवसायासाठी प्रशिक्षण वर्गांचा उपयोग त्यांना झाला.

 नफ्याशिवाय उद्योग होतो का?' हा सवाल सावित्राबाईंना करताच त्या म्हणतात, नफा मिळत असल्याशिवाय कोणी माणूस उद्योग करेल का? अर्थात उद्योगातून दर वेळी नफा मिळतोच, कमी किंवा जास्त एवढंच.' वाडकर कुटुंबाचा सगळ्याच उद्योगांचा अनुभव चांगला आहे. सावित्राबाईंच्या सर्वच उद्योगांना वर्षभर भरपूर खप आहे. खर्च आणि नफा यांच्या ताळमेळाचा विचार करून त्या मालाची किंमत ठरवतात आणि डोळसपणे उद्योग करतात. घरातले सगळेजण लागेल, पडेल आणि असेल ते काम करतात. त्याला योग्य ते प्रशिक्षण, मार्गदर्शन घेतात. उद्योगातल्या शंका विचारतात, सल्ला घेतात आणि स्वत: त्याचा ताळमेळ घालतात. उत्साह, चिकाटी, कामसूपणा, निरीक्षण, सल्लामसलत, प्रशिक्षण, हिशोब, ताळमेळ या खांबांवर वाडकरांचे उद्योग यशस्वीपणे चालू आहेत.

 उद्योग यशस्वितेचं घरामधे प्रतिबिंब -

 यशस्वी उद्योग म्हणजेच आर्थिक स्थैर्य, सुबत्ता. या यशस्वितेचं प्रतिबिंब वाडकरांच्या घरामध्ये सहजपणे दिसतं. त्यांचा शिवणाचा जम व्यवस्थित बसला पण गावात पुरुषांचे कपडे शिवणारा शिंपी नाही म्हणून त्यांनी मुलाला आय. टी. आय.ला शिवण शिकायला पाठवले. आता त्यांच्या घरी मोटारीवर चालणारी दोन शिलाई यंत्रे, गिरणीची चक्की, ५ म्हशींचा मोठा गोठा हे त्यांच्या उद्योगाचं चित्र. तर त्याचबरोबर, रंगीत टि.व्ही. मिक्सर, मोटारसायकल, इमर्जन्सी लॅम्प, नऊ खोल्यांचं मोठं घर अशा अनेक सुविधा सहजपणे बघायला मिळतात.

***

उद्योगाला आवश्यक उत्कृष्ट मानवी संबंध.    २७