पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/१९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 घरी शेतीचा व्यवसाय -

 शिळीमकरांची १० एकर शेती आहे. सैन्यातून निवृत्त झालेले वडील, भाऊ सगळे शेती करतात. भात, ज्वारी, गहू, घेवडाही पीकं घेतली जातात. शेतीला पूरक असा व्यवसाय निवडायच्या दृष्टीनी त्यांनी कुक्कुटपालन सुरु केलं आणि त्याचबरोबर शेळीपालन करत आहेत. या सगळ्या कुटुंबाचा या उद्योगाला पाठिंबा आहेच.

 निराशेचे प्रसंग -

 २० शेळ्या, घेऊन ३ वर्षांपूर्वी या उद्योगाला सुरुवात झाली. २० च्या ५० आणि ५० च्या ८० शेळ्या झाल्या. उद्योग उभा राहणार असं दिसू लागलं आणि कुठल्यातरी साथीच्या रोगात अचानक एका दिवसात ४७ करडं दगावली. ३०-३२ शेळ्या वाचल्या आणि जणू पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करण्याची वेळ आली. पण शिळीमकर खचले नाहीत किंवा ह्या उद्योगाच्या नादी न लागता सरळ नवीन उद्योग सुरू करावा असंही त्यांना वाटलं नाही. उलट अशा प्रसंगातूनही निभावून जाणं त्यांना जास्त गरजेचं वाटतं.

 डोळ्यात तेल घालून निगराणी -

 सतत वाढत रहाणाऱ्या शेळ्यांसाठी शेतामध्ये जागा बांधली आहे. शेत घरापासून लांब आहे. रात्री-अपरात्री कोल्ह्यासारख्या जनावरांपासून भीती असते.म्हणून रात्री शिळीमकर शेतावरच राहतात. दिवसाही जनावरांकडे लक्ष ठेवावंच लागतं.

 याशिवाय शेळींचे आजार, औषधं अशी देखभाल करावी लागते. स्वच्छता राखावी लागते. एवढी निगा राखूनही एखाद्या नवीन, माहीत नसलेल्या रोगाला शेळ्या बळी पडतात.

 उद्योगाचं फलित अजून नाही -

 ३ वर्ष नेटानं, निगुतीनं हा उद्योग करूनही त्याचं फळ अजून मिळालं नाही व प्रत्यक्ष विक्री करून फायदा मिळाला असं फार घडलं नाही. पण या उद्योगाच्या क्षमतेची जाणीव शिळीमकरांना आहे. हा उद्योग यशस्वी होतो अशी खात्री आहे. म्हणूनच नवीन लोक या उद्योगात येत आहेत. आपण उद्योग सुरू केला आणि जमत नाही म्हणून बंद केला तर लोकांचा आपल्यावर विश्वास राहणार नाही. म्हणून ते म्हणतात. 'उद्योगात अपयश येतंच पण त्यातूनच जिद्दीनी वर जायचं म्हणून मी हा उद्योग करतो.

***


उद्योजकतेसाठी प्रामाणिकपणा अत्यावश्यक असतो.     १६