पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आता स्वत:च बाजारपेठेपर्यंत जातात. त्यांनी स्वत: पुण्याला स्टॉल लावला. ठाण्यामध्ये स्वत:च मार्केटिंग केलं आणि त्यामुळे मार्केटिंगच्या मधल्या माणसाला मिळणारे पैसेही त्यालाच मिळाले. कच्च्या मालाच्या खरेदीपासून वस्तू बनविणे आणि बाजारपेठेपर्यंत नेणे या उद्योगाच्या सगळ्याच बाबी निवृत्तीसारखा पंचविशीतला युवक एकट्याच्या हिमतीवर करतो. आज ७-८ जणांना रोजगार उपलब्ध करून देतो. हे एक यशस्वी उद्योजकाचं उदाहरण नक्कीच म्हणता येईल.

***

 चिकाटीने करत राहायचं   

 नाव - विजयकुमार राजाराम शिळीमकर

 राहणार - कुरंगवाडी

 वय - २८

 शिक्षण - एस. एस. सी.

 उद्योग - शेळीपालन

 शेळीपालन -

 शिळीमकरांनी एक वेगळाच व्यवसाय निवडला आहे. शेळी पालनाचा. पूर्वी त्यांचा कुक्कुटपालनाचा उद्योग होता. त्यामध्ये तोटा आला आणि नवीन उद्योग निवडला शेळी पाळण्याचा. मनात सारं होतं पण पैशाच्या पाठबळाशिवाय काय होणार? कुणीच या व्यवसायासाठी पैसे देईना. मग त्यांनी १०,०००/- रु. संस्थेकडून कर्ज घेतले. अर्थातच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन ३ वर्षांपूर्वी त्यांनी या कामाची सुरुवात केली.

  प्रशिक्षणाने सुरुवात -

 कापूरहोळ इथे त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ ५ कोर्स केले. या प्रशिक्षण शिबिरात शेळीची निवड, त्यांच्या जाती, शेळीची निगा, विशिष्ट काळजी, त्यांचं खाद्य, ते खाद्य मिळवायचं कुठून, कसं, विविध आजार, त्यावरची औषधे अशी सर्वांगीण माहिती दिली जाते. असं प्रशिक्षण घेऊन आज एकाच गावात ४ जण शेळीपालनाचा व्यवसाय करत आहेत. या सर्वांची मिळून एक सोसायटी तयार करण्याचा विचार चालू आहे.

एकमेका सहाय्य करु. अवघे धरू सुपंथ     १५