पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 बांबूच्या या उद्योगाला भांडवल फार लागत नाही. कमी भांडवल, जास्त कसब, कौशल्य, सतत नावीन्य, खपाची आणि कामाची खात्री असं या धंद्याचं स्वरूप आहे. सुरुवातीला प्रबोधिनीकडून १०००/- रुपये कर्ज घेऊन या उद्योगाला सुरुवात झाली. पहिले काही वर्ष प्रबोधिनीकडूनच मालाची मागणी होत राहिली. कामाचं प्रशिक्षण, भांडवलाची सोय आणि बाजारपेठेशी संपर्क या तीनही गोष्टी वाढल्या आणि अप्रत्यक्षपणे उद्योगालाही त्याचा उपयोग झाला.

 इतरांना प्रशिक्षण दिलं -

 एकदा धंदा वाढायला लागल्यावर मदतीची गरज वाढली. पण हे कसब सहज कसे मिळणार? या भागातला हा नव्या प्रकाराचा व्यवसाय. त्यामुळे बांबूचं काम माहीत असणारे मदतनीस मिळेनात. मग निवृत्तीनं स्वत:च हाताखाली काम करण्यासाठी स्वत:च्या भावासह चार मुलांना प्रशिक्षण दिलं. आता निवृत्तीच्या शिकवण्यातूनच तयार झालेली चार मुलं आणि चार स्त्रिया काम करतात. ह्या धंद्याची वाढती गरज लक्षात आल्यावर निवृत्ती स्वत:हून इतरांना अशा प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देतो. आणखी लोकांनी शिक्षण घेऊन, माहिती जमवून उद्योगात पडावं असं त्याला वाटतं.

 नवीन शिकण्याची, करण्याची तयारी -

 बांबूच्या उद्योगात जास्त मागणी शो पिसेस सारख्या वस्तूंना असते. त्यामुळे त्यात सतत नवेनवे प्रयोग करून पहावेच लागतात. वेगवेगळ्या वस्तू बांबूपासून कशा करायच्या यासाठी काम करून पहावं लागतं, गरजेप्रमाणे बांबूवर प्रक्रिया करावी लागते. नवीन वस्तूंबरोबर नवीन डिझाइन्सही करावी लागतात. निवृत्ती सतत ३ वर्ष या नावीन्याच्या शोधात आहेत. लँपशेड, ग्रिटींग, पेनस्टँड, ट्रे अशा अनेकविध वस्तू त्यांनी स्वत: डिझाइन करून बाजारात आणल्या आहेत. त्यातही त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे बांबूचे वॉलबोर्ड, जे वर्षभराचं काम असत. गेल्या वर्षी त्यांनी अगदी नवी कल्पना प्रत्यक्षात आणली. बांबूच्या राख्या तयार केल्या. या वेगळ्या कल्पनेला पुष्कळ मागणीही मिळाली.

 निवृत्तीसारखा कलाकार सतत नवीनतेचा शोध घेतो आणि त्यातच त्याला आनंद मिळतो. कलाकारी आणि कलेबरोबर व्यवसाय अशी जोड इथे लाभली आहे.

 बाजारपेठेचा शोधही स्वत:च -

 तयार मालाची पहिली मागणी असते योग्य बाजारपेठेची. बाजारपेठेशी संपर्कात असणं आणि मालाला मागणी मिळवत रहाणं यावर उद्योगाची यशस्विता अवलंबून असते. हे मर्म जाणून निवृत्ती संस्थेच्या मदतीनंतर

क्षितीज नवे मज सतत बोलवी     १४