पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/१६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 पारंपारिक कलेला आधुनिक जोड   

 नाव - निवृत्ती हरिभाऊ सुतार

 शिक्षण - १०वी

 राहणार - वेल्हे, ता. वेल्हे, जि. पुणे.

 व्यवसाय - बांबूच्या वस्तू बनविणे

 उद्योगाचं नाव - तोरणा हस्तकला उद्योग.

 दहावीनंतर दिशा शोधताना-

 निवृत्ती हरिभाऊ सुतार या भारदस्त नावाचा हा अवघ्या २० वर्षांचा कृषि तांत्रिक विद्यालयातला मिसरुड फुटू लागलेला मुलगा. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे काय करावं? याचा विचार सुरू झाला. त्यातलाच एक प्रयत्न म्हणून शिवापूरच्या शाळेत निवृत्तीनी वेल्डरचं प्रशिक्षण घेतलं. तिथे पहिल्यांदा संस्थेशी संपर्क आला. त्यानंतर नागपूरला बांबूचा प्रशिक्षण वर्ग होणार असल्याची माहिती तिथूनच कळली. त्या प्रशिक्षणाला निवृत्ती गेला. तिथे बांबू निवडणं, त्यावर प्रक्रिया करणं इथपासून बांबूच्या अनेक वस्तूही शिकवल्या. यातून निवृत्तीला आपली दिशा सापडली. त्याचं ३ वर्ष काम केल्यावर अजून नवीन तंत्र शिकण्याची गरज भासली. संस्थेच्या मदतीने तो त्रिपुरातल्या अगरतळा येथल्या केंद्रावर ६ महिन्याचं पुढच्या टप्प्याचं प्रशिक्षणही घेऊन आला.

 स्वत:च्या उद्योगाला सुरुवात -

 घरामधे सुतारकामाची पार्श्वभूमी होतीच. वडिलांच्या या कामामध्ये निवृत्तीही मदत करत असे. बांबूचा प्रशिक्षण वर्ग केल्यानंतर सुतारकामाचं कसब बांबू या माध्यमात वापरावं असं त्याला वाटू लागलं. कौशल्य आणि तंत्र यांचा संगम झाला आणि त्यातून बांबूपासून तयार झालेलं स्वस्त, सुंदर घर आकाराला आलं. ३० फूट लांब बांबूचे वासे, तट्ट्या यातूनही मजबूत, सुंदर घर होऊ शकतं याची निवृत्तीला खात्री होती आणि त्या विश्वासाचं प्रत्यक्षात रूपांतर त्यानं करून दाखवलं.

 सुतारकामातून हा मुलगा बांबूच्या नादी लागला म्हणजे बुरुडाची कामं करायला लागला असंही काहींना वाटलं. पण हे काही कमी दर्जाचं काम नाही, तर कौशल्य आणि नवनिर्मितीचा आनंद हे या धंद्याचं वैशिष्ट्य आहे हे समजून निवृत्ती या व्यवसायात आला. सतत नवीन काहीतरी करण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. घरातूनही या कामाला पाठिंबा मिळाला.

कल्पकता हे उद्योजकतेचे गमक आहे.    १३