पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 गेल्या काही वर्षापासून मंदीच्या लाटेमुळे आजूबाजूचे छोटे मोठे उद्योग कामाअभावी पटापट बंद पडू लागले. अशा परिस्थितीत घारेमामांचा उद्योग मात्र नीट चालू आहे. त्याचं श्रेय आहे घारे मामांच्या व्यावसायिक दूरदृष्टिला आणि भूमिकेला.

 व्यवसायाची तत्त्व -

 घारे मामा सांगतात उद्योग करताना काही तत्त्व सांभाळावी लागतात. शब्द देणं आणि दिलेला शब्द पाळणं हे रक्तात भिनावं लागतं आणि व्यवहारात ते वर्तनातून दिसावंही लागतं. याशिवाय आपलं काम चतु:सूत्रीवर चालतं - योग्य दर्जा, योग्य किंमत, योग्य वेळेत काम पूर्ण करणं आणि पूर्ण संख्येत माल देणं.

 ही चतु:सूत्री कसोशीने पाळणं हा उद्योगाचा पहिला महत्त्वाचा पाठ आहे. यामुळेच ग्राहकाचा विश्वास राखता येतो आणि इतरांपेक्षा आपला वेगळेपणा उठून दिसतो. कष्ट, मेहनत, चांगूलपणा यांच्याबरोबरीनं चतु:सूत्री पाळायला हवी.

 उद्योगाचा वेगळेपणा आणि आधुनिकता -

 लेथ मशिनवर जॉब करण्याचा अनेक जण करत असलेलाच व्यवसाय घारेमामा करत आहेत पण तरीही त्यांच्या उद्योगाचं स्वरूप इतरांपेक्षा वेगळं दिसतं. कारण घारेमामांनी आपली वेगळी क्षमता जाणीवपूर्वक सिद्ध केली आहे. उद्योग वाढवायचा आणि वाढता राखायचा असेल तरं उद्योगाचं स्वत:चं वेगळं वैशिष्ट्य आणि इतरांपेक्षा वेगळी क्षमता सिद्ध व्हायला पाहिजे हे घारेमामा ओळखतात.<

 त्यादृष्टीनी त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. अभियांत्रिकीची अनेक पुस्तकं, मासिकं ते आवर्जून वाचतात. तांत्रिक भागाचा अभ्यास करतात. या व्यवसायातले बदलते प्रवाह, नवी आव्हाने समजून घेतात. त्यासाठी पुण्या-मुंबईच्या प्रदर्शनांना भेटी देतात. यामुळे त्यांच्या उद्योगाला वेगळं परिमाण मिळालं आहे.

 अभियांत्रिकीची कुठलीही पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले नसतानाही मामांनी अनुभवानं आपली तांत्रिक तज्ज्ञता स्वत: विकसित केली आहे. या अभ्यासातून त्यांनी उद्योगाची वेगळी शाखा चालू केली. त्यानुसार वर्कशॉपमधे ते नवीन डिझाइनसाठीची यंत्रे विकसित करतात. हे काम संख्यात्मक नसून गुणात्मक आहे म्हणूनच बाजारात त्याला सतत मागणी रहाणार हे गणित निश्चित आहे.

***


१०
पराभवाची भीती फक्त मनात असते, प्रत्यक्षात नसते.