पान:केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपर्क वाढला.

उद्योगाचा सर्वांगीण अनुभव -

 कोटीभास्कर उद्योगात त्यांनी शिकाऊ उमेदवारापासून व्यवस्थापकांपर्यंत सर्व पदे एकानंतर एक सांभाळली. त्यामधे जबाबदारीचा विभाग होता - संशोधन आणि विस्तार. नवीन जॉबवर संशोधन करून तो आपल्या इथे तयार करायचं आव्हानात्मक काम त्यांनी केलं. या प्रकारचा पहिला जॉब होता किर्लोस्कर वॉटर पंप्स. त्या जॉबचं डिझाइन घारे यांनी केले. या शिवाय पैशाचे व्यवहार, हिशोब हा विभागही सांभाळला. उद्योगाचं सर्वांगीण प्रशिक्षणच जणू इथे अनुभवता आलं आणि अर्थातच त्याचा उपयोग त्यांना स्वत:च्या उद्योगात झाला..

नोकरी करतानाच उद्योगासाठी तयारी -

 नोकरी करत असतानाच घारे मामा (याच नावानी मामांना सारे परिसरात ओळखतात.) आपला उद्योग चालू करायचाच हे ध्येय बाळगून होते. लहानपणी नात्यातली लोकं नोकरीसाठी मुंबईला जाऊन झोपडपट्टीत राहताना पाहिली होती. त्यामुळे अशी लाजिरवाणी नोकरी आणि असं जगणं त्यांनी केव्हाच अमान्य केलं होतं. त्यातूनच स्वत:चा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिल.

 ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घारे कुटुंब काटकसर करून जाणीवपूर्वक बचत करत होते. साधं जीवन जगायचं आणि पै पै करत भांडवल उभं करायचं असं धोरण बरेच वर्ष चालू होतं. वीस वर्षांची नोकरी आणि बचत यातून घारे यातून कुटुंबीयांनी एवढं भांडवल उभं केलं की ९२-९३ साली स्वत:च्या जिवावर उद्योग चालू करता आला.

उद्योग संकटांची मालिका आणि त्यावर मात -

 स्वत:च्या भांडवलातून घारेमामांनी मशिन घेतलं, शेडही उभी केली. कामगार तयार केले. त्यांना शिकवलं. उद्योग चालू झाला. पण ह्या उद्योगाला बाळसं चढेना कारण अनेक संकट कोसळू लागली. घारे मामांच्या पायावर मशिन पडलं आणि अधूपणा आला. कामं कमी झाली. बँकेत शिल्लक शून्य झाली. आर्थिक आणि मनुष्यबळाच्या अभावी उद्योग कमी कमी व्हायला लागला.

 यातूनही घारेमामांनी मार्ग शोधला. शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात केली. काही काळ मध्यस्थाप्रमाणे काम केलं. जॉब दुसऱ्याकडून करवून घेतले. आर्थिक बाजू सावरती केली. पुन्हा एकदा कामगार जमवले आणि आज त्यांच्याकडे २५ यंत्रे आहेत आणि ३०-३५ कामगार. भारत फोर्ज, बजाज स्कूटर, यासारख्या उद्योगांसाठी सुटे भाग तयार करतात.

गरज ही शोधाची जननी आहे.