पान:काश्मीर वर्णन.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 काश्मीर देशाच्या वर्णनाविषयी आह्मीं पांच सहा इंग्रजी ग्रंथ वाचले. त्या सर्वांत या देशास भूस्वर्ग असे नांव दिलेले पाहून त्याच्या दर्शनाचा लाभ आपण एकवार तरी करून घ्यावा ह्मणून इच्छा उत्पन्न जाहली, ती पांच सात वर्षे मनांत घोळत होती. पण आमच्या वयाच्या अशक्तपणामुळे व प्रपचांतील प्रेमबंधनामुळे ती अगदी शिथिल जाहली होती. तत्रापि आमच्या बलवत्तर दुर्दैवार्ने उपट खाऊन ते बंधन तोडिलें आणि आह्मांस घरांतून बाहेर ओढून काढून ती शेवटास नेवविली. असो.
  हा देश पंजाबच्या ईशान्येस आहे व यास भूस्वर्ग ह्मणतात, एवढे पुष्कळ लोकांस माहित आहे. याहून विशेष माहिती असणा-या लोकांची संख्या फारच थोडी सांपडेल. याचे मुख्य कारण मराठी भाषेत या विषयावर ग्रंथांची उणीव असे आह्मांस वाटते. अलीकडे हा देश पाहून आलेल्या एक दोन गृहस्थांनी मासिक पुस्तकांत व सप्ताहिक वर्तमानपत्रांत या देशाविषयी चित्तवेधक अशी बरीच माहिती दिली आहे, पण साद्यंत व संगतवार ज्यांत वर्णन मिळेल असा ग्रंथ आमचे तरी पाहण्यांत आलेला नाहीं. या विषयावर इंग्रजी भाषेत बरेच ग्रंथ आहेत, पण शुद्ध प्राकृत भाषा जाणणारांस त्यांचा काय उपयोग ? ही उणीव अंशतः तरी दूर व्हावी व आपल्या जन्मभाषेची कांहीं सेवाही घडावी असा विचार मनांत आणून, हे लहानसे पुस्तक तयार करून प्रिय वाचकांस नजर केलें आहे.