पान:काश्मीर वर्णन.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४१ )

ह्मणून आमच्या हांजींनी सांगितलें. अर्थात् हें द्वार ओलांडून सरोवरांत कसें जातों ह्मणून आह्मांस मोठी भीति पडली होती, पण हांजींनी मोठी मेहनत करून हुशारीनें किस्ती आंत नेली; तेव्हां आमची काळजी दूर झाली.
 येथें जी अति मनोहर वनश्री आमच्या नजरेस पडली तिचें वर्णन करावें तितकें थोडेंच होणार. नाना प्रकारच्या कमलवेली व दुसऱ्या वेली, शिंगाडे, लव्हाळा व शेवाळ यांचा सरोवराच्या पृष्ठभागावर गालिचा पसरल्या सारखा दिसत होता. कमल पत्रांवरील जलबिंदु मौक्तिकां- प्रमाणें शोभत होते. सरोवराच्या उत्तर व पूर्व बाजूंस पर्व- तांनीं गरका दिला असून नजर जसजशी दूर फेकूं लागलों तसतशी एकापेक्षां एक अधिक उंच होत गेलेली शिखरें दृष्टीस पडूं लागलीं. यांतील कांहींनी शुभ्र, आरक्त, श्याम व हरित रंगांची वस्त्रे परिधान केल्यासारखा भास होत होता. कांहींवरून लहान मोठ्या आकारांचे मेघ- समूह ओळकंबत असलेले पाहून हे कां हत्तींचे कळप तृषा शांत करण्यास पायथ्याजवळच्या झऱ्याकडे खाली उतरत आहेत की काय असा भास होई. कांहीं सूर्य किरणांनी संतप्त होऊन लाल झाली असून त्यांच्या देहां- तून जलधारा वाहत होत्या. कांहीं अभ्रजालाच्या आड होऊन त्याचा आश्रय करूं पाहत होती. या तापापासून आपला बचाव करण्याकरितां कांहींनी मोठमोठे वृक्ष मस्तकीं धारण केले होते. त्यांच्या पायथ्यापाशी प्लेन, चिनार व टील इत्यादि वृक्षांची दाट झाडी असून तींतून शालीमार बाग, नजीवबाग, चष्मापाई, पेरीमहाल दुसरीं रम्य स्थलें व द्राक्षवेलींचे मंडप हीं दृग्गोचर