पान:काश्मीर वर्णन.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४०)

नसतें. याच्या वायव्य कांठावर नजिब नांवाचा एक बाग आहे. तेथें मात्र पाण्याची खोली २५-३० फूट आहे असें ह्मणतात. सोंतीकल नांवाचा कालवा या सरोवरांतून निघून वितस्तेस शेरगडी राजवाड्याचे खालच्या बाजूस येऊन मिळतो. याची लांबी सुमारें एक मैल असून रुंदी ५० फूट होईल. याच्या दोहों- बाजूस पॉप्लर नांवाचे शेंकडों वृक्ष लावले असून त्यांत ' कांहीं चिनारही आहेत. हें सरोवर पाहण्यास आम्ही ऐन दोन प्रहरीं निघालों. राजवाड्याचे थोडे खालीं जातांच कालवा लागला. त्यांतून आमच्या हांजींनी किस्ती हांकली. डावे बाजूस धर्मदास नांवाचें लहान पण टुमदार मंदिर दिसलें. उजवे बाजूस चिनार बाग लागला. तेथें चिनार वृक्षांची दाट झाडी असल्यामुळे त्यास वरील नांव पडलें आहे. या बागेत साहेब लोक तंबू देऊन राहतात. थोडेंसें पुढे गेलों तों उजवीकडे शंकर व डावीकडे हरि या नांवाचे पर्वत दिसूं लागले. हा देखावा पहात पहात आम्ही कालव्यांतून दल सरोवराच्या दाराजवळ गेलों. तेथें सरोवरास एक मोठें धरण बांधलेले असून त्यास एक द्वार राखिलें आहे. सरोवरांतील पाणी बाहेर सोडण्याचे वेळीं हें द्वार उघडतात. तेव्हां कालव्यांत जो पाण्याचा लोंढा येऊं लागतो त्यास ओढ फार असते. यामुळे या द्वारांतून किस्ती सरोवरांत नेतांना ती उलटण्याचा संभव विशेष असतो. आह्मी ज्या दिवशीं हैं सरोवर पाहण्यास गेलों, तेच दिवशीं सकाळीं द्वार उवडलें होतें ह्मणून कालव्यांतून येणाऱ्या पाण्यास ओढ फार होती. हें स्थल मोठें धोक्याचें असून तेथें वारंवार दंगे होतात,