पान:काश्मीर वर्णन.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२ )

वाटे. अखेर बारावर तीन वाजण्याचे सुमारास श्रीनगर आह्मांस दृग्गोचर झालें. तत्रापि तेथील राजवाडे, मंदिरें, मशिदी व शहरांतील दुसऱ्या इमारती यांजवळ जाण्यास आणखी एक तास लागला. श्रीनगर शहर पाहण्याचा विचार आमचे मनांत पुष्कळ वर्षे घोळत होता आणि तो घडून आला ह्मणून एक प्रकारें मोठा संतोष वाटला. पण जसा घडून यावा तसा आला नाहीं असा विचार मनांत येऊन तें फार खिन्न झालें. असो. या मार्गक्रमणरूप वर्णनानें आमचे प्रियवाचक बरेच थकले असतील; करितां आह्मी आतां थोडक्या अवकाशांत त्यांस बिन्हाडीं नेऊन विश्रांति देतों अगर घेतों. रावळ- पिंडी येथे श्रीनगरांतील तीन बड्या कामगारांस पत्रें मिळवून ठेविलीं होतीं, तीं बाहेर काढिली आणि त्या पत्रांचे मालक कोठे राहतात, याचा तपास करूं लागलों असतां श्रीनगरचे गव्हरनर आपल्या महाराजांच्या स्वारीबरोबर जम्मूस गेले असल्याचे समजलें. तेव्हां दुसन्या कामगाराचा शोध केला. तेही बाहेर गेले असं- ल्याचे लोकांनी सांगितलें. अर्थात तिसरें पत्र काढिलें तें राय बहादूर पंडित सुराजकोल यांचे नांवाचें होतें. हे गृहस्थ महाराजांच्या कौन्सलचे सिनियर मेंबर आहेत. आह्मी यांच्या राहण्याचा तपास करून तेथें गेलो. पत्र त्यांस पावतें केलें. त्यांनी आमची भेट घेऊन जरूर असलेल्या सर्व गोष्टींची आह्मास मदत करण्यास आपल्या हेडक्लास सांगितलें. हे गृहस्थ मोठे सभ्य व पोक्त विचारी दिसले. आह्मीं त्यांचा निरोप घेतला आणि त्यांनी दिलेल्या बिन्हाडीं जाऊन उतरलों.