पान:काश्मीर वर्णन.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९ )


होतें त्याचें लागलेंच स्मरण झालें. तेव्हां या तुफानाविषयीं हांजीस विचारितां ऐन दुपारचे वेळी येथे नेहमीं वावटळी सुटून मोठ्या लाटा मारू लागतात आणि उन्हाळ्यांत तर हा सर्व दर्या तुफान होऊन किस्त्या पालथ्या पाडतो करितां त्यावेळी येथे कोणीही त्या चालवीत नाहीत, असे त्याने सांगितले. या भयंकर तुफानांत येथील गुलाबसिंग महाराज एके प्रसंगी सांपडले होते. तेव्हा त्यांजवरोबर असलेल्या तीनशे नौकांचा त्यांच्यांतील सेवकजनसह नाश झाला, खुद्द महाराज मात्र मोठ्या पराकाष्ठेनें बचावले असा लेख आहे. या सरोवराचा परिघ ३० मैल आहे. या जलाशयाविषयी अशी एक आख्यायिका आहे की चंद्रपुर नांवाचे गांव पूर्वकाली येथे होते. पण दुर्वास ऋषीच्या शापाने ते नाहीसे होऊन तेथे हे सरोवर बनले. यांत पानकोंबडी व दुसरे जलचर-पक्षी आणि मासे यांची शिकार चांगली सांपडते व येथे शिंगाडे फार पिकतात. एवढा मोठा जलाशय आपल्या देशांत दुसरा कोठे नाही. याच्या पूर्व कांठावर उत्तरेस बांडीपूर व दक्षिणेस संबळ हीं गांवें आहेत. याच्या मुखाजवळ लंका नांवाचे एक छोटे बेट आहे. त्यांत तुतीची व दुसरी झाडे असून ती द्राक्षवेलींनी अगदी गुंफून गेली आहेत. आगस्ट महिन्यांत या वेली द्राक्षाच्या घोसांनी अगदी ओथंबून जातात.
 या स्थली जो अति मनोहर देखावा आमच्या दृष्टीस पडला, त्याचें हुबेहूब चित्र रेखण्यास आह्मीं तर असमर्थ आहों. पण आमच्या प्रियवाचकांस त्याची कांहीं कल्पना यावी ह्मणन होईल तेवढे त्याचे वर्णन देण्याचा प्रयत्न करितों.