पान:काश्मीर वर्णन.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७ )


दहीं मात्र मिळत नाही. देवगांव में बरासुलाहून ९ मैल आहे. दबगांव येथें हाप ( एक वनस्पति )च्या विस्तीर्ण बागा आहेत. हजन येथें एक सरकारी पागा असून तीत शेकडों घोडीं आहेत. इकडे हांजी व त्याच्या बहिणी यांनी आळीपाळीनें किस्ती हांकण्याचें काम चालू ठेविलें होतें. नाव चालविण्याच्या कामीं जातेवेळीं वल्ह्यांचा उपयोग फार करीत नाहींत. नावेस एक लांब दोरी बांधून तिचा शेवट पुरुष किंवा बायको पाठीकडून डोक्यावरून घेऊन तें पुढच्या बाजूस छातीस बांधितात आणि एक बैली मोटेप्रमाणे नदीचे कांठाने नाव ओढीत जातात. कित्येक वेळां दोन पुरुष किंवा दोन बायका अगर एक पुरुष व एक बायको वर सांगितल्याप्रमाणे दोरी बांधून नाव ओढीत जातात. या देशांत अत्यंत थंडी असल्यामुळे दुपारी भोजनाचे वेळी सुद्धा आह्मी आंगावरील सर्व कपडे काढीत नव्हतों व लाडक्या कांग्रीचा आश्रयही बहुधा सर्वकाल असेच, पण आमचे हांजी व त्याच्या बहिणी ऐन थंडीच्या वेळीं सुद्धां पाणी, चिखल व कांटेकुटे यांतून अनवाणी पायांनीं जनावरांप्रमाणें नाव ओढीत चालत. पोटाची खळी भरण्याकरितां गरीब लोक नाहीं तसले हालवनवास सोशितात. पण सरासरीच्या मानाने यांस रोजचा एक आणा सुद्धां मजुरी पडत नाहीं; त्यामुळे त्यांस हत्तीभोग तांदूळ, मका, शिंगाडे, कमळाचे देंठ व दुसरीं कंदमुळें यांजवरच बहुतकरून निर्वाह करावा लागतो. या लोकांस चहा पिण्यास फार आवडतो आणि तो घेण्यास दोन चार आणे बक्षिस ह्मणून कोणी दिले असतां ते मोठे खूप