पान:काश्मीर वर्णन.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३ )

आहेत. या गांवाच्या खाली नदीचें पात्र कांहीं अवकाशपर्यंत उथळ असल्यामुळें तेथें नावा चालत नाहींत. या गांवाच्या तिन्ही बाजूस सफेदा व दुसरे वृक्ष यांची दाट झाडी लागून गेली असून एके बाजूने वितस्ता . वाहत गेली आहे, तेणेकरून या गांवास मोठी शोभा आली आहे. येथून श्रीनगरास जाण्यास दोन मार्ग असल्याचे पूर्वीच सांगितले आहे; पण व्यापारी व बहुतेक प्रवासी लोक होडीतून जाण्यायेण्याचे पसंत करितात. यामुळे येथे लहान मोठ्या शेकडों, होड्या दृष्टीस पडतात. कांहीं माल भरून जात येत असतात. कांहींत माल चढविण्याची व कांहींतून तो उतरून घेण्याची गडबड चालू असते. कांहीं प्रवासी टांग्यांतून उतरून पुढे श्रीनगरास जाण्याकरितां होडीचा ठराव करीत असतात. कांहीं श्रीनगराहून परत येऊन टांग्यांत किंवा एक्कयांत आपले सामान ठेवून परत निघण्याच्या घाईत असतात. मि० धनजीभाई पारसी मेलकंट्याक्टर यांचा गुमास्ता येथें असतो. तो आपल्या नांवावर आलेला माल तपासून घेऊन तो जिकडच्या तिकडे रवाना करण्याच्या गडबडीत असतो. सारांश लहानशा बंदराप्रमाणे येथें मोठा मजेदार देखावा दिसतो. पुढे वरील गुमास्त्याचे मार्फत एक होडी भाड्याने ठरवून तींत आमचे सामान नेऊन ठेविले, आणि हांजीस (नावाडी) होडी चालू करण्यास सांगितले असतां शेजारचे झणजे (बरामूलागांव) पाहावयास जाण्याची त्याने शिफारस केली. कांहीं तरी करून हा आमचा वेळ घालविणार असे वाटून आम्हीं श्रीनगर पाहावयास आलो आहों. मार्गातील खेडीं