पान:काश्मीर वर्णन.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २२ )

आपणांस. यश तरी कोठून मिळणार ! याप्रमाणें मनाची समजूत करून आह्मी तेथून जवळ गांव होतें तेथें गेलों, आणि जाग्याचा तपास करूं लागलों. कोठेही रात्र काढण्यापुरती बरीशी जागा मिळेना. अखेर एक जागा मिळाली. ती पाहून हें स्थल केवळ लंबकर्णाचें ठाणें असावें व त्यांचा खरा मालक अन्य स्थली गेल्यामुळे हे आपणांस मिळत आहे असे वाटलें. गरजवंतास अक्कल नाहीं, व अशा थंडदेशी अगदी उघड्यांत रहावें तर अजारी पडण्याची भीति असा विचार करून आम्हीं ती रात्र कशी तरी त्याच जागेंत काढिली.
 उरी येथे भोजन करून पुढें निघालों. वाटेंत पांडुगड नांवाचा जीर्ण दशेस आलेला एक किल्ला. लागला. त्यांत जातेवेळीं मोडकळीस आलेली एक कमान दृष्टीस पडली. तिचें काम इतकें भव्य व मजबूत आहे कीं, तें पाहून मन अगदी थक्क होऊन जातें. आंतल्या बाजूस एक अगदीं पडके शिवालय मात्र दिसलें. येथून पुढे रामपूर गांव लागले. नंतर अस्तमानचे चार वाजतां आह्मी बरामुला येथें येऊन पोहोचलो. याचे मूळ नांव वराहमूल; श्रीविष्णूने तिसरा अवतार येथे धारण केला असल्यामुळे यास हे नांव पडलें ह्मणून कथा सांगतात. वरामुला हे काश्मीरच्या मुख्य दऱ्यांत जाण्याचे द्वार असल्यामुळें त्यास द्वारपति असे ह्मटले आहे. राम, सीता व हनुमान् यांच्या नांवांची पवित्र कुंडे येथून थोड्या अंतरावर आहेत. वितस्तेच्या अगदीं कांठावर हा गांव वसलेला आहे. येथे तिचें पात्र ४२० फूट रुंद असून तिजवर एक पूल बांधलेला आहे. त्यास आठ कमानी