पान:काश्मीर वर्णन.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६ )

बदलत जातो, तसतसा ह्या शिखरांचा वर्ण पालटत जाऊन एक प्रकारचा इतका मनोहर देखावा उत्पन्न होतो की, तो पहातच रहावे असे वाटते. असा रम्य देखावा आपल्या देशी कोठून दृष्टीस पडणार असे वारंवार मनांत येऊ लागते.
 दुसरे दिवशी भोजन करून आह्मी अकरा वाजता मरीहून निघालो. रस्त्याच्या दोहोंबाजूस ओक, पाईन व दुसरे प्रचंड वृक्ष यांची दाट झाड़ी लागते. यांतील कांहीं वृक्ष शंभर फुटांपेक्षा अधिक उंच होतील असे वाटले. मार्गात निरनिराळ्या स्वादिष्ट फलांनी लादलेल्या कराच्या (बैलगाड्या), उंट, घोडी, खेचरें व गाढवे, यांचे तांडे केव्हां केव्हां आडवे येत असलेले पाहून त्यांनी वाट द्यावी ह्मणून कोचमन ब्युगल वाजवी. ते ऐकतांच तांडेवाले लोक आपली जनावरे एके बाजूस वळविण्याचा यत्न करू लागत. तों ती दुस-याच बाजूने चालू लागत. तेव्हा त्यांची मोठी त्रेधा उडून जात असे. पण यांत नवल मानण्यासारखें कांहीं नाहीं. कारण, ज्ञानी मनुष्यांस सरळ मार्गाने चालण्याचे शिक्षण देण्यास जर फार श्रम घ्यावे लागतात, तर हे अज्ञानी पशु, त्यांत बैल व गाढव यांस मार्गावर आणण्यास महत् प्रयास पडणे हे साहजिकच आहे. असो. याप्रमाणे सुमारे दहा बारा मैल पुढे गेलों तों महानदी जी वितस्ता ( झेलम ) हिने आमचा तिच्या भेटीस जाण्याचा दृढनिश्चय पाहून बालरूप धारण करून आह्मांस दर्शनलाभ दिला. बालरूप म्हणण्याचे कारण आह्मांस दर्शन देण्यापूर्वी ती वुलर नांवाच्या सरोवरांतून बाहेर पडते, तेव्हा तिचे रूप मोठे भयंकर दिसते. तेही पुढे