पान:काश्मीर वर्णन.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५ )

वारंवार चकित होऊन जाई. याप्रमाणे मार्ग क्रमीत आह्मी संध्याकाळचे पांच वाजतां मरी येथे जाऊन दाखल जाहलों.
 मरी हे गांव हिमाचलाच्या पायथ्यावर वसलेले आहे. याची उंची समुद्राच्या सपाटीपासून ७,५०० फूट आहे. येथील हवा इंग्लंदाप्रमाणे किंवा काश्मीरांतील हवेपेक्षा अधिक थंड असल्यामुळे इंग्रज लोक या स्थलास फार चाहतात. लाहोर, रावळपिंडी व पैशावर या प्रांतांतील पुष्कळ साहेब लोक सवडीप्रमाणे येथे वारंवार येऊन राहतात. यामुळे येथे मुख्य वसति त्याच लोकांची आहे. ऐन हिवाळ्यांत येथील वसति अडीच तीन हजार असते, पण गरमीच्या दिवसांत ती आठ हजारांपर्यंत वाढते. येथील देखावा अति रमणीय आहे. कारण, येथे झाडी घनदाट असून, तींतून पर्वताच्या पायथ्याशी बाजार वसलेला आहे. त्याच्या वरच्या बाजूस मध्यम प्रतीच्या लोकांचे बंगले किंवा तशाच नमुन्यावर बांधलेली घरें आहेत आणि जसजसे वर जावें तसतसे एकापेक्षां एक अधिक उंच स्थळे पाहून त्यांजवर कैलासवासी गौरकाय लोकांनी आपले बंगले बांधले आहेत, ते दृष्टीस पडतात. बाजारच्या खालच्या बाजूस मोठे खोल दरे असून त्यांत हिरवीं गार शेते व मधून मधून लहान खेडी दृग्गोचर होतात. पुढे या टेकडीच्या पूर्व बाजूस पाहिले असतां काश्मीरांतील बर्फाच्छादित शिखरे जणू काय गगनास टेकू देण्याच्या ईर्षेने एकाहून एक उंच होत गेलेली दृष्टीस पडू लागतात. यांतील काहीं बर्फाने व कांहीं ढगांनी आच्छादिलेली दिसतात. सूर्यप्रकाश जसजसा