Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उत्तम उत्तम एक साधा प्रयोग आपल्याला करता येईल. तो आहे, प्रत्येक गोष्ट उत्तम करण्याचा वाचत असलो तर ते मनापासून, एकाग्रतेने वाचण्याचा. जे वाचतोय तेही उत्तम प्रतीचं. त्यामुळे मिळणारा आनंद हादेखील उच्च प्रतीचा. हे करता येईल आपल्याला. अशा उत्तमाचा ध्यास मनात असायलाच हवा. कोणताही प्रयत्न करायचा तो मनापासून, जीव ओतूनच. रोजचा दिवस, त्यात रोजचीच कामं, त्यात काय जीव लावणारं असं नाही. अगदी रोजचा स्वयंपाक, तोदेखील मनापासून, विचार करून, वेळ बघून आणि चविष्ट करता येणार नाही का? कामाची गती एक वेळ थोडी कमी झाली, वेळ अधिक लागला; पण काम उत्तम असेल असा विश्वास असला म्हणजे झालं. त्यामध्ये आपला म्हणून एक ठसा उमटवता येईल. घरी असो, ऑफिसात असो किंवा अगदी दुकानात नोकरी असो, जे अंगावर घेऊ ते उत्तम पार पाडू असा निश्चय मनात हवा. समोरच्याला तसा विश्वासही वाटायला हवा. आपल्या मर्यादा जाणून घेऊन आयुष्यात अशा उत्तम काम करण्याच्या संधीची वाट बघायला हवी. किंबहुना प्रत्येक काम एक संधी म्हणून वरच्या प्रतीला नेता यायला हवं. कार्यसंस्कृती ९४