Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्णायक क्षणांसाठी इसवी सन २००३ च्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रिकी पॉन्टिंगनं कर्णधाराला साजेशी बहारदार खेळी केली. स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये तो असं खेळला नाही. त्यानं जणू काही त्याचं सारं शौर्य आणि प्रतिभा शेवटच्या सामन्यासाठी किंवा निर्णायक क्षणांसाठी राखून ठेवलेली होती. निर्णायक क्षण, त्या क्षणासाठी आपलं सर्वस्व राखून ठेवणं आणि अचूक वेळी ते वापरण्याचं कसब अंगी बाणवणं फार आवश्यक आहे. हे कसब आपसूक येत नाही. मिळवावं लागतं. परीक्षा असो की नोकरीसाठी इंटरव्यू. महत्त्वाची व्यावसायिक बोलणी असोत की एखादं प्रेझेंटेशन, ती वेळ निर्णायक महत्त्वाची. त्या वेळी आपल्याकडे असलेल्या प्रतिभेचा उत्तम आविष्कार जमण्यासाठी एक आत्मविश्वास लागतो. मनोवृत्ती लागते. उत्तम शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, मेहनत, जिंकण्याची अपार तीव्र इच्छा, आतल्या केंद्राचं सुरेख संतुलन ह्यानं ते जमतं. हे सारं पॉन्टिंगकडे होतं, आपल्याकडे नव्हतं. कार्यसंस्कृती ८२