Jump to content

पान:कार्यसंस्कृती.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रुटीनमधला दम सेवाग्राम आश्रमात राहण्याची अनेकांना वेळ येते. तिथं गांधीजींच्या काळापासून आश्रमाचं वेळापत्रक आहे. तिथं राहणाऱ्यांना ते पाळावंच लागतं. पहाटे प्रार्थना, सूर्यास्ताला प्रार्थना, आणि जेवणाच्या वेळा ठरलेल्या. मी जितके दिवस तिथं राहिलो आहे, तितके दिवस आश्रमाच्या रुटीनमुळे एकूण सगळा दिवस अगदी व्यवस्थित डोळ्यासमोर असतो. लांबलेल्या चर्चा आणि गप्पा यात दिवस अघळपघळ आणि विस्कळितपणे चाललेला असतो. तेवढ्यात संध्याकाळची प्रार्थना सुरू होते. डोळे मिटले जातात. डोकं शांत होतं. मनातला गोंधळ हळूहळू शांत होऊ लागतो. मन अधिक ताजंतवानं होतं. एकाग्र होतं. कामासाठी एक उत्साह, उभारी मनाला निश्चितपणे जाणवते. त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टी करायच्याच असा एक नियम करायचा आणि तसं वागायचं. त्या रुटीनची सवय लागली की त्या त्या वेळेस आतूनच ते ते काम करण्याची स्फूर्ती मिळते. रुटीनमध्ये ताकद आहे. रुटीनमध्ये एक प्रकारची प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. कार्यसंस्कृतीची आणि रुटीनची फारकत केवळ अशक्य आहे. ४३ कार्यसंस्कृती