६७. एका वेळी एक
मनात आहे एक आणि आपण करतो आहोत काही भलतंच. असं झालं की काय गंमत होते ते
मी आज पाहिलं. सरिता आज ऑफिसात आली तीच तिच्या घरी चाललेली सर्व चर्चा जेवणात घेऊन, तिचा मुलगा दहावीत आहे आणि तो आज ज्या क्लासमध्ये जातो आहे तो काही बरोबर नाही, असं त्यांच्याकडे सकाळी ठरलं. सरिता एक जागरूक आई असल्यानं आपल्या मुलाच्या शिक्षणाची काळजी तिला होतीच.
तिनं मग सगळ्यांना विचारायला सुरुवात केली. प्रत्येकाच्या टेबलापाशी जाऊन, तिचं तर लक्ष नव्हतंच पण इतरांनादेखील तिनं तिच्या मनातल्या वादळात ओढलं.
मग जो परिणाम व्हायचा तोच झाला. त्या दिवशी आमचं अकाऊंट स्टेटमेंट बनवायचं होतं. त्यात फार मोठ्या गफलती राहिल्या. सरिताकडून त्या दिवशी काही गंभीर चुका झाल्या. सरिता एकटी नाही. आमच्यामधले बरेचसे तिच्यासारखे आहेत. आपलं मनातलं वादळ दुसऱ्यांचं लक्ष विचलित करण्यापर्यंत मोकळं सोडणारे. एका वेळी एकच गोष्ट करण्याची कार्यशैली हवी. बसलो आहे तर फक्त बसावं. विचार करतो आहे तर फक्त विचार करावा. चालतो आहे तर फक्त चालावं.