पान:कार्यशैली.pdf/९०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६५. धारेचा सर्वंकष विचार करवतीला धार असेल तर लाकूड कापणं सहज आणि सोपं होतं. कमी श्रमात, कमी त्रासात, सोपं, पण करवतीचं असं असतं की एकदा धार केली की झालं असं नसतं. धार सतत करावी लागते. रोजच्या रोज.
 कामाचं असंच आहे. काम आपण करतो. माणूस. त्यामुळं माणसाचं काम सहज, विनासायास व्हायचं तर त्याला धार असायला हवी आणि ती धार सतत टिकायला हवी.
 मग धार माणसाला हवी म्हणजे नेमकी कशाकशाला हवी? तर ती धार शरीराला हवी, बुद्धीला हवी, कौशल्यांना हवी, मनाला हवी आणि वृत्तीला हवी.
 शरीराच्या धारेसाठी उत्तम व्यायाम, आहार आणि विश्रांती हवी. बुद्धीला धार लावण्यासाठी वाचन हवं, मेहनत हवी. सराव हवा. कौशल्यांना धार लावण्यासाठी वाचन हवं. मनाला धार लावण्यासाठी विरंगुळा हवा, करमणूक हवी. वृत्तीला धार लावण्यासाठी तत्त्वचिंतन हवं, तात्त्विक बैठक हवी, तसा सतत शोध हवा.

 उत्तम काम करायचं तर हा धारेचा सर्वंकष विचार हवाच हवा.

८९। कार्यशैली