पान:कार्यशैली.pdf/८९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४. तुमचं नावं प्रकाशचा फोन पुन्हा पुन्हा यावा असं वाटतं आणि फोन ठेवत असताना त्यानं तो ठेवू नये असंही वाटतं. असं होण्याची कारणं दोन. एक म्हणजे प्रकाशचा अत्यंत अगत्यपूर्ण असा आवाज आणि दुसरं महत्त्वाचं कारण तो आणि त्याच्या बोलण्यात पुन्हा पुन्हा येत असलेलं तुमचं नाव. प्रत्येकाला स्वत:चं नाव विलक्षण प्रिय असतं. त्या नावासाठी माणूस काय काय करतो? जेव्हा समोरचा, बोलणारा माणूस अत्यंत अगत्यपूर्वक तुमचं नाव सारखं सारखं घेतो तेव्हा तुम्हाला खचितच बरं वाटतं. आतासुद्धा मी फोन ठेवला तेव्हा माझ्या लक्षात आलं की दोन मिनिटांच्या आमच्या बोलण्यात त्यानं माझं पाच वेळा नाव घेतलेलं होतं, पाच वेळा. फोनवर आल्या आल्या 'हॅलो, काय म्हणतोयस' म्हणून नाव, मग काही नवं सांगताना 'अरे' म्हणून घेतलेलं नाव आणि अगदी फोन ठेवतानासुद्धा अगदी स्निग्ध आवाजात घेतलेलं आपलं नाव. नावं घेत पुन्हा पुन्हा घेत, बोलण्याची प्रकाशची पद्धत सुरेख आहे यात वादच नाही.

कार्यशैली।८८