पान:कार्यशैली.pdf/८७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२. 'शॉपिंग मॉल मोठ्या शॉपिंग मॉल' मध्ये जायला मला आवडतं पण आणि नाही पण. ते आवडतं अशासाठी,की तिथं फिरताना मला माणसांच्या कल्पनाशक्तीचा एक उत्तुंग आविष्कार दिसतो.किती वेगवेगळ्या प्रकारे जमवलेल्या वस्तू असतात. किती धमाल असते, किती सर्जनशीलता दिसत असते.

 मात्र असं असलं तरी 'शॉपिंग मॉल' मध्ये फिरणं फार आरामाचं नसतं.थोडं त्रासाचंच असतं. तो त्रास मनाला असतो; कारण तिथली प्रत्येकच गोष्ट विलक्षण आवेगानं मला घ्या, मला घ्या म्हणत तुम्हाला आव्हान देत असते आणि ठायी ठायी तुमच्या मनाला प्रश्नांच्या भेंडोळ्यात टाकत असते. त्यामुळे मला आज काहीही म्हणजे काहीही घ्यायचं नाही किंवा 'मी आज फक्त मला हवी असलेली छोटी बॅग घ्यायलाच आलो आहे' असा ठाम निश्चय केल्याशिवाय मॉलमध्ये जाणं साफ चुकीचं आहे. जीवन हे 'शॉपिंग मॉल'सारखं आहे. अद्भुत गोष्टींचं उत्तुंग प्रदर्शन. त्यामुळं तिथं फिरताना काय घ्यायचं याचा ठाम निश्चय नसेल तर तुम्ही भंजाळणार हे निश्चित.

कार्यशैली।८६