पान:कार्यशैली.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६१. मामास



 ली आयकोका यांनी आपल्या यशाचं सूत्र तीन शब्दात सांगितलं आहे. ते म्हणतात,"माणूस, आपण जे उत्पादन करतो त्याची गुणवत्ता आणि फायदा या तीन गोष्टींवर जो लक्ष ठेवतो, तो यशस्वी होतो." तो माणूस, माल आणि मलिदा किंवा फायदा 'मा' ते माणूस, 'मा' माल, आणि 'म' मलिदा.
 ली आयकोका आणि पुढे म्हणतात की, या तीन गोष्टी साखळी पद्धतीनं येतात. माणसं जोडली ती सांभाळली आणि जोपासली की आपण जे करतो आहोत त्याची वाढ होत राहते. तशी वाढ होत राहिली आणि त्यात गुणवत्तेचा विचार आला की फायदा किंवा मलिदा मिळायला सुरुवात होते. मात्र त्याच्यावरही लक्ष ठेवावंच लागतं. फायदा कायम काहीही न करता नुसताच होत राहत नाही.

 या सर्व प्रक्रियेची किंवा चक्राची सुरुवात मात्र माणसापासूनच होते, याचं पक्कं भान ठेवलं पाहिजे. माणूस जोडायचा तो माणूस जोडायचा म्हणून. केवळ फायदा करायचा म्हणून माणूस जोडायला गेलात तर फसाल असंच आयकोका पुढे आपल्याला सांगतात.

८५। कार्यशैली