पान:कार्यशैली.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६०. माणसाचा चेहरा



 मीटिंगमध्ये एखादा विनोद झाला नाही तरी रमण फ़िदिफिदि हसे, आणि हसताना तो वाकुल्या दाखवणान्या एखाद्या माकडासारखा दिसे. दात दाखवत, नाक फुगवून आणि वर करून हसतानाचा त्याचा एक कुत्सित, टिंगलखोर भाव त्याच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट दिसे.
 मीटिंग सुरू झाल्यापासून त्याचं हे वागणं मी पाहत होतो आणि मला सारखी डेसमंड मॉरिसची आठवण होत होती. मॉरिस हा एक उत्तम निरीक्षण करणारा प्रभावी लेखक आहे. मॅनवॉचिंग अशा नावाची त्याची पुस्तकं तर जगप्रसिद्ध आहेतच पण त्याशिवाय बी.बी.सी. वरची त्याची एक सुंदर मालिकाही आहे.
 डेसमंड मॉरिस म्हणतो की माणूस हा एक प्राणी तर आहेच पण त्याच्या देहबोलीमध्ये, हावभावामध्ये प्राण्यांच्या छटा मिसळलेल्या असतात, आणि त्या दिसतात. तेव्हा माणसाचा भाव त्या प्राण्यासारखा असतो. आज जसा रमण माकडासारखा वाकुल्या दाखवत मीटिंगमध्ये फिदफिदी हसत होता, तसा.

 माणसाचा चेहरा त्याच्या आतमध्ये काय चाललेलं आहे ते दाखवतो. जसा रमण त्याचा टिंगलखोर स्वभाव दाखवत होता तसा.

८३