५९. पुनर्जन्म
चित्रीकरण चालू असताना अमर शिवदासानी जेव्हा कोसळून पडला तेव्हा तो पुन्हा आत्मविश्वासानं, नव्या उमेदीनं उभा राहील असं वाटलं नाही. आम्हा सर्वांनाच वाटलं की तो संपला. 'बर्न आऊट' झाला. अतिकाम, त्या कामाचा ताण, यशाच्या शिखरावर असल्यानं चारी बाजूंनी होत असलेली प्रचंड मागणी यानं अमरची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती कमी कमी होत असल्याचं आम्ही सारेच पाहत होतो.
सहा महिन्यानंतर मात्र मी पाहिलं तेव्हा मला चकित व्हायला झालं. संपूर्ण नवी उमेद आणि ताकद घेऊन अमरनं दोन नवे चित्रपट करायला घेतलेले होते. हे सारं कसं झालं असं म्हटल्यावर अमर म्हणाला की त्यानं तीन पातळ्यांवर एकूण बारा गोष्टी केल्या.
स्टुडिओत कोसळून पडल्या पडल्या थोड्या वेळानं त्यानं दीर्घ श्वसन केलं. लगेच केलेल्या कृतीतील ही पहिली गोष्ट. मग त्यानं स्वतःची समजूत काढली आणि तीन दिवसांच्या आराम सुट्टीवर निघून गेला. त्या सुट्टीत निकटच्या मित्रांबरोबर त्यानं सुंदर गप्पा मारल्या, अगदी मनसोक्त.
८१। कार्यशैली