पान:कार्यशैली.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४. सोडा म्हणजे राहील



 एखादी गोष्ट हातात घट्ट धरून ठेवली की ती पडत नाही हे खरं आहे. अर्थात हे जरी वस्तूच्या बाबतीत खरं असलं तरी माणसांच्या बाबतीत याच्या अगदी उलट आहे.
 माणसं आपण कितीही घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ती निसटून जातात. किंबहुना आपणं जितकं घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करू तितकी ती सटकतात, अधिक वेगात. जरा आसपास नजर टाका म्हणजे मी म्हणतो आहे ते तुम्हाला पटेल.
 होतं काय की वेगवेगळ्या उपायांनी आपण माणसांना बांधू लागतो, आणि मग त्यांची कुचंबणा व्हायला सुरुवात होते. मग धरून ठेवणाऱ्याला आणि धरलेल्याला एकमेकांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. धरणारा अधिक जोरानं धरू पाहतो तर धरलेला सुटण्याचा विचार करतो. धरलेला धरलेलाच राहतो पण त्याचंच मन बाहेर उडून गेलेलं असतं आणि मग मन नाही, पण माणसाचं शरीर आहे अशी अवस्था होते.

 याला एक उपाय आहे. सोडून द्या. माणूस तुमच्याकडे राहील; कारण माणसाला मुक्ती प्रिय आहे आणि म्हणून मुक्ती देणाऱ्याला तो चिकटून राहतोच, चिकटून राहीलच.

७५। कार्यशैली