पान:कार्यशैली.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५२. दोन तुटलेल्या छत्र्या



 उन्हाळ्यात बॅगेत छत्री ठेवावीशी वाटतेच. बसमधून उतरून थोडंसं अंतर चालतानादेखील छत्रीच्या सावलीत चांगलं वाटतं म्हणून समोरच्या कपाटातली छत्री घेतली तर लक्षात आलं की त्याची एक काडी तुटलेली आहे. मी चिंतेत पडलो. काय करावं असा विचार करत राहिलो.
 तेव्हा एकदम आठवण आली. घरात दुसरी छत्री होती ती काढली. बाल्कनीत जाऊन ती उघडली तर तिचीदेखील तीच अवस्था. तिच्या तर दोन काड्या तुटलेल्या.
 मी विचारात पडलो. आता छत्री नाही तर काय करायचं, असा प्रश्न नव्हता तर दोन तुटलेल्या छत्र्या कशा काय राहिल्या असं वाटत होतं.
 दोन तुटलेल्या छत्र्या. मला आठवलं. मागच्या वर्षी एकीच्या काड्या तुटल्या म्हणून दुसरी घेतली आणि पहिली पार विसरून गेलो. आता दुसरी तुटली आणि छत्रीच नाही अशी परिस्थिती आली.

 वेळच्या वेळेस पडलेलं भोक लिंपून टाकण्याची कार्यशैली हवी. रोजच्या प्रश्नांचं उत्तर रोज, रोजच्या थकण्याला विश्रांती रोजची.

७३। कार्यशैली