५१. योगिनीच
माझ्या मोबाईलचं बिल भरायला मी अगदी आवर्जून जातो, खरं म्हणजे पोस्टानं चेक पाठवून किंवा कुणाबरोबर तरी रोख पैसे धाडून देता येतील, पण तसं मी नाही करत. मी आवर्जून तिथे जाण्याचं कारण 'ती' आहे.
ग्राहकांचं ऐकून घेण्यासाठी त्यांच्या शंका-कुशंकांना उत्तरं देण्यासाठी आणि बिलाचे पैसे स्वीकारण्यासाठी तिथं एक डेस्क आहे. तीन मुली तिथं झगडत असतात. आणि ही त्यांची बॉस आहे.
प्रत्येक वेळी कुणी ना कुणीतरी बिलाविषयी तक्रार घेऊन आलेलं असतं. रागाचा शब्द वाढत असतो. तिथल्या मुलीही कावलेल्या असतात, पण 'ती' सगळ्या सगळ्याला तोंड द्यायला समर्थ असते.
हसतमुख असते. प्रत्येक प्रश्नाला शांतपणे, ठामपणे उत्तरं देत असते आणि मनाचा तोल ती कधीही म्हणजे कधीही ढळू देत नाही, प्रत्येक वेळेला मी पाहत असतो की आत्ता तिचा तोल जाईल, मग जाईल, पण नाही. काहीही झालं तरी ती स्थिरच असते. योगिनीच ती, मोबाईल कंपनीत असली म्हणून काय झालं?
७१। कार्यशैली