Jump to content

पान:कार्यशैली.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४४. शिवीवाला


 तो येतो तो मुळी वादळासारखा. सुसाटत, घोंघावत, आवाज करत आणि शांत वातावरणाचा चुराडा करत. आल्या आल्या भेटल्या भेटल्या तो एक अस्सल शिवी देतो. त्याला शिवी दिल्याशिवाय सुरूच करता येत नाही.
 त्यानं शिवी हासडली की मग मी चपापून आसपास पाहतो. वरमतो. पण त्याला त्याची फिकीर नसते. तो त्याला जे वाटत असतं ते मग बकत असतो, ओकत असतो. मनातली घाण बोलण्यावाटे फेकत असतो. तो असं बोलायला लागला की त्याचा चेहराही विचित्र बनतो. विस्कटतो, भेसूर आणि राक्षसी दिसतो. तो शांत नाही. अस्वस्थ आहे. तो पोखरला गेला आहे. रागानं-असूयेनं अन्दुः खानं.
 मूळचा तो तसा खूप चांगला आहे. अस्सल आहे. पण मनाची अस्वस्थता तो अशा फूत्कारांवाटे टाकण्यानं तो आता समाजापासून तुटलेला आहे. त्याला ते माहीत नाही. पण सारेच त्याला त्यामुळं टाकतात. जवळ करत नाहीत.

 मला त्याला सांगायचंय. बऱ्याच वर्षांपासून बोलायचंय. त्याच्यातला चांगला माणूस. त्याची ओळख त्याला करून द्यायची आहे. मात्र ते कसं करावं ह्याच चिंतेमध्ये मी आहे.

६१. कार्यशैली