४२. नेहमी नवा अनुभव
दिल्लीहून अमृतसरला जाणारी शताब्दी म्हणजे एक कमाल ट्रेन आहे. त्या दिवशी मात्र माझा प्रवास एक अगदी वेगळ्या कारणानं अविस्मरणीय झाला. माझ्याशेजारी एक विलक्षण तेजस्वी असा माणूस बसलेला होता. शुभ्र कपडे. दाढी अन् डोळ्यात चमक. मी माझं काम करत होतो. थोडा गडबडीत होतो. लुधियानात होणाऱ्या परिसंवादात जे प्रेझेंटेशन करायचं होतं, त्याची तयारी करत होतो. मधनंच हातातली पेन्सिल खाली पडत होती. उठण्या-बसण्यात घाई होती, मनात थोडी अधीरता होती. असंच सारं चालू असताना सीटवरून उठताना माझा धक्का त्याला लागला आणि मी सॉरी असं म्हणतो न म्हणतो तोच तो हसून म्हणतो कसा "सम्हल के, आराम से, जो करना है धीरे से करो, नया अनुभव मिलेगा."
नंतर प्रवासात आमच्या खूप म्हणजे खूपच गप्पा झाल्या.
त्याचं म्हणणं तंतोतंत खरं होतं. अगदी सकाळी दाढी करताना किंवा बुटाच्या लेस बांधतानादेखील त्यातला मनस्वी अनुभव केवळ गती कमी करण्यात आला, येत राहिला, येत गेला.
दिल्लीहून अमृतसरचा प्रवास म्हणूनच मी कधीच विसरणार नाही.