Jump to content

पान:कार्यशैली.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३९. बैलशैली


 सतीश हा कामात बैल आहे असं मी म्हणते तेव्हा माझ्या मनात कुठंही उच्चनीचतेची भावना नाही. बैल जसा काम करतो तसा सतीश करतो. म्हणून फक्त म्हणालो म्हणजे असं की सतीशच्या कामाची शैली ही बैलासारखी आहे, बैलशैली.
 खाली मान घालून सतीश एकदा का सकाळी नऊ वाजता टेबलावर बसला की मग फक्त तो, त्याचा कॅलक्युलेटर मित्र आणि त्याची ती मैत्रीण आकडेमोड तिचं नाव, सरळसोट हिशेब नांगरत सतीश कामाचा फन्ना करतो. त्याला फक्त कुणीतरी काम सांगणारा किंवा सांगणारी हवी असते आणि हवं भरपूर काम. ऑफिसात काय किंवा घरी काय दोन्हीकडे सतीशची हीच पद्धत. घरी सुजाता त्याला रविवारी सकाळी कामाची यादी देऊन निवांत स्वयंपाकघरात जाते. जेवायच्या वेळेपर्यंत सगळी कामं नांगरून तयार. मधनं मधनं फक्त मोबाईलची रिंग हवी फटकारायला की झालं.

 सतीश कामाला लागला की त्याला पाऊस पडल्याचं कळत नाही की समजत नाही.खोलीतले पडदे बदलल्याचा बारकावा पकडताच येत नाही, सरळसोट नांगरता-नांगरता कडेच्या बांधावर उमललेली कळी तो पाहूच शकत नाही. बैलशैली म्हणजे सरळसोट नांगरणं, बाकी काही माहीतच नाही.

५५। कार्यशैली