पान:कार्यशैली.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६. कुलपं आणि कुलपं



 वसंताबरोबर मी त्याच्या घरी गेलो आणि त्यांनी खिशातून एक जुडगा काढला.'जुडगा?' मी विचार करत राहिलो. आता इतक्या किल्ल्यांमधून हा आपली योग्य ती किल्ली कशी काढेल बरं? असा विचार करत राहिलो. पण वसंतानं सराईतपणे एक किल्ली शोधली आणि लॅचला लावली. खार, खार, खार असे तीन आवाज झाले. मग त्यानं दुसरी किल्ली काढली, आणि मोठं थोरलं जे कुलूप होतं त्याला लावली. त्यानंतर बघतो तर आणखी एक कुलूप, छोटं पण स्टील रंगाचं मजबूत.
 इतका सारा सोपस्कार करून दार उघडून मग आम्ही व्हरांड्यात आलो तर व्हरांड्याच्या दाराला पुन्हा एक कुलूप. तिथनं सरकत्या लोखंडी दाराला सहावं कुलूप. मी विचारलं तर वसंता म्हणतो की सुरक्षितता बरी असते. एवढा बंदोबस्त करून गेलं की मग डोक्याला टेन्शन नसतं.

 मला स्पष्ट दिसत होतं. वसंता कितीही म्हणाला तरी असुरक्षितता त्याच्या मनात होती.कोणीही कितीही म्हटलं तरी कुलपानं त्याच्या मनातली भीती जाणं शक्य नव्हतं. त्यासाठी काही वेगळाच उपाय आवश्यक होता.

५१। कार्यशैली