Jump to content

पान:कार्यशैली.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४. यशाची किंमत



 यशस्वी व्हायलाच हवं पण ते कुणाविषयी द्वेषभावना ठेवून नको. जिंकायला हवं ते बाष्कळ आक्रमकता ठेवून नको. यश चाखायला हवंच पण ते उर्मटपणा टाळून, यशस्वी व्हावं पण ते वेड्यावाकड्या मार्गानं नव्हे किंवा शक्तीचा, बडेजावाचा बाष्कळ वापर करूनही नव्हे.
 याचं कारण आहे की, आपण आज जरी एखाद्या शॉर्टकटनं किंवा विचित्र मार्गाचा अवलंब करून यश मिळवलं असलं तरी आपण ज्या मार्गावरून आलेलो असतो त्या मार्गावरचे काटे आपल्या अंगाला लागलेलेच असतात. आपण काम करताना ध्येयाचा आणि ते प्राप्त करण्यासाठी स्वीकारत असणाऱ्या मार्गाचा विचार हा आपण केलाच पाहिजे.
 चुकीच्या मार्गानं यश मिळवलं तर मग जे काटे आपल्या अंगाला लागतात त्यानं आपण अधिक वृद्ध बनतो आणि आपण आपल्या यशाचा पुरा आनंदही घेऊ शकत नाही.
 जगण्याच्या संघर्षात अनेक माणसं ही चूक करतात. कुठल्याही मार्गानं ती यश मिळवतात अन् ते करता करता इतकी थकतात आणि क्षीण होतात की त्याचा आनंद ही माणसं घेऊ शकत नाहीत.

 यश मिळविताना कामाची शैली अधिक तारुण्य टिकवणारी असावी. थकवणारी नको.

४९ / कार्यशैली