पान:कार्यशैली.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३३. मोठ्या आणि छोट्या गोष्टी



 सांगा बरं, काय महत्त्वाचं? आज मधुकरचं बोर्डासमोर भाषण आहे, त्यानं गेले सहा महिने खूपच खपून प्लॅन तयार केला आहे, तो त्याला सर्वांसमोर ठेवायचा आहे आणि कालच नवे बूट आणले आहेत, जे त्याच्या पायाला फार चांगले बसत नाहीत, टोचतायत. सांगा पाहू, भाषण महत्त्वाचे की बूट? तर अर्थात भाषण, ज्यावर मधुकरनं सहा महिने गाढ मेहनत घेतली तीच गोष्ट अर्थात महत्त्वाची, पण सांगतो की तो बारीक टोचणारा बूट मधुकरच्या सहा महिन्यांच्या कामगिरीवर सुरेख बोळा फिरवू शकतो.
 छोट्या गोष्टी अन् मोठ्या गोष्टी. कमी महत्त्वाच्या अन् जास्त महत्त्वाच्या.मात्र छोट्या गोष्टींची ताकद अशी की त्या मोठ्या गोष्टींना सुरुंग लावू शकतात.

 रुटीनमध्ये, दैनंदिन शिस्तीमध्ये आणि नियमांमध्ये छोट्या गोष्टींचा निचरा होऊ शकतो.त्यावर उत्तरं मिळू शकतात. रोजच्या जगण्यातला अवकाश छोट्या गोष्टी निपटवून टाकू शकतो. भाषणांच्या दिवशी मधुकरनं शांतपणे आवरायला घेतलं तर बुटाची गडबड त्याच्या लक्षात येईल. सर्व लक्ष भाषणाकडंच ठेवण्याचं तो सर्वतोपरी प्रयत्न करील.

४७