पान:कार्यशैली.pdf/४७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२. दुर्लक्ष करण्याची कला चंद्रकांतचं सिगरेट ओढून येणं मला विलक्षण त्रास देतं. बंद कॉन्फरन्स रूममध्ये तो वास मीटिंग संपेपर्यंत छळत राहतो. रागिणीच्या सेंटचं असंच आहे. सकाळी सकाळी गुडमॉर्निंग करायला येते. अन् सगळी एकाग्रता बिघडवून टाकते.
 वर्तमानपत्रातल्या बलात्काराच्या किंवा हिंसाचाराच्या बातम्या, राजकारणातला भ्रष्टाचार या गोष्टी अशाच मन विचलित आणि विस्कळीत करतात. रस्त्यावरची बेशिस्त, रहदारी, आवाज करत चालणारी लिफ्ट किंवा सपशेल खोटं बोलणारे राजकारणी अशीच मनाची शांतता घालवतात, लय बिघडवतात.

 मनाची धारणा अशी हवी की मनाची शांती बिघडताच कामा नये. आपलं आयुष्य फार मौल्यवान आहे.अनावश्यक आणि ज्या घडल्या तरी ज्यांचा परिणाम काहीच होत नाही,अशा घटनांचा ओरखडा मनावर उमटूच देऊ नये. परिणामहीन गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं.आपण आपल्या मनाची तन्मयता साधत शांतपणे दिवसाच्या प्रवाहात आपली होडी टाकावी.वल्ह्याचा रंग आवडत नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करावं.

कार्यशैली। ४६