पान:कार्यशैली.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८. फार्स आणि लढाई



 रिचर्ड होत्स नावाच्या लेखकाचं एक सुंदर पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. युद्धामध्ये माणसं कशी वागतात, त्यात त्यांच्या स्वभावाचे कंगोरे, छटा कशा दिसतात, याचं फार सुंदर वर्णन होत्स यांनी केलं आहे. त्यात एके ठिकाणी ते म्हणतात की युद्धात दोन्ही असतं, हशा असतो, फार्स असतो आणि दुःखही असतं, दारुण, भीषण.
 आपलं रोजच्या जगण्यातसुद्धा असंच असतं पाहा. अहो वेगळं काय असणार आहे. युद्ध काय अन् रोजचं जगणं काय, मजेदार प्रसंग, लटका राग, प्रेम, कुणाची तरी खिल्ली, कुठंतरी असलेली घोर निराशा, पराभव, नव्या पहाटेची नवलाई, कुत्सित शब्दांच्या जखमा, सारं काही.

 फार्स आणि दारुण दुःख या दोन अवतरणात रोजचं जगणं असतं. अन् तसं असतं म्हण. ते जगण्यासारखं असतं. वेगवेगळ्या चवीचं, शेडस्चं, अन् रंगाचं. ते सगळे घेऊन, सारं स्वीकारून हसायला हवं, काम करत राहायला हवं. एखाद्या योद्ध्यासारखं, फार्स आणि दुःखाच्या अवतरणातील लढाई खेळत.

कार्यशैली। २८