पान:कार्यशैली.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७. कुचकाम्या


 हार्चर्ड युनिर्व्हसिटी प्रेसनं प्रकाशित केलेलं आणि हॅरी लेव्हिसननं लिहिलेलं 'एक्झिक्युटिव्ह' नावाचं एक अभ्यासू पुस्तक आहे. त्या पुस्तकात डोस्टोव्हस्की या महान लेखकाचं एक महान वाक्य आहे. डोस्टोव्हस्की म्हणतो, “एखाद्याला खरोखरच माणसातून उठवायचं तुम्ही ठरवलंत तर एकच करायचं त्याच्या कामाला कुचकामीपणाचा स्पर्श करायचा, बस्स."
 "आपण जे करतो आहोत त्याचा काही उपयोग नाही, मी नकोसाच आहे. सगळं वातावरण असं आहे की काही घडणारच नाही. काही होणारच नाही. माझा काही उपयोग नाही" अस माणसाला वाटायला लागलं की मग त्याची शक्ती आणि आकांक्षाच त्याला खायला सुरुवात करते आणि माणसाच्या आतला महत्त्वाचा सांधाच निखळतो.
 आपण पाहू या, आपण जिथं आणि ज्यांच्यासोबत काम करतो आहोत तिथं कुणाला स्वतःच्या कुचकामीपणाबद्दल खात्री नाही ना? कुणाला उपयोगशून्य वाटत नाही ना?

 मी एकदा असं पाहिलं आहे की, असं स्वतःविषयी कुचकामी आहोत असं वाटणं खूपजणांकडे आहे. कमी-जास्त प्रमाण आहे, पण आहे. व्यापक आहे आणि ते गंभीर आहे यात शंका नाही.

२७। कार्यशैली