पान:कार्यशैली.pdf/२६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५. मानवी संबंधाचं जाळं


 संजूचा सहवास सर्वांना हवाहवासा वाटतो, सर्वांनाच. सतत हसतमुख, नानाविध माहितीनं सज्ज आणि सतत विनोद अन् कोट्यांची कारंजी थुईथुई नाचत असलेली. तो येणार म्हटलं की आमच्या घरात एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. आनंदमयी चैतन्य पसरतं. सगळे जण त्याच्या येण्याची वाट पाहत असतात. संजूचं वागणंच असं लाघवी अन् स्निग्ध मैत्रीचं आहे. एक सुंदर-सहज अशी त्याची वागण्याची शैली आहे. कुणालाही मोहवून टाकणारी, कुणालाही खिळवून, अडकवून टाकणारी.
 मी त्याला नेहमी नीट निरखत असतो. तो काय बोलतो, कुठनं एवढे सारे तपशील जमवतो याचं नेहमी आश्चर्य करत असतो. त्याची वागण्याची, बोलण्याची पद्धत जवळून अभ्यासत असतो.
 आताआताशा मला त्याचा, त्याच्या मेहनतीचा अंदाज येऊ लागला आहे. तो प्रचंड वाचतो, खूप काही पाहतो, लोकांचं बरंच ऐकतो, थकत नाही, कंटाळत नाही, लोकांना भेटत राहतो, त्यातून कापूस पिंजावा तसा तो माणूस पिंजून काढतो. त्याच्या नोंदी ठेवतो. त्यातून स्वतःचं वर्तुळ विस्तारत नेतो.

 आज संजू लहान आहे. पण तो असंच दहा वर्ष करत राहिला अन् त्याला एक स्वप्न सापडलं तर तो महान सामाजिक किंवा राजकीय आश्चर्य निर्माण करेल याची मला पक्की खात्री आहे.

२५। कार्यशैली