१४. शब्द, आवेग अन् वेदना
एक हजार मूर्ख शब्दांपेक्षा एखादा आर्त शब्द थोर परिणाम देऊ शकतो. पॉप कॉर्नच्या मशीनमधून ताडताड उडणाऱ्या लाह्यांप्रमाणे काही माणसं नुसती बोलत राहतात, शब्द फोडत बसतात. पण ते कुठले शब्द, ती तर अक्षरामागून ठेवली जाणारी अक्षरं, वारुळातून मुंग्या फुटाव्यात आणि धरणातून पाणी कोसळावं तसं काहीसं बोलणं.
ही माणसं अशी का बोलत असावीत, असा मी विचार करतो तेव्हा वाटतं, या माणसांची भूक
असेल मान्यतेची. कुणी तरी ऐकण्याची किंवा या माणसांना वेदना असेल, कुठेतरी आत खोलवर किंवा वाटतं ही माणसं आपला खरा चेहरा लपवत असतील. या शब्दांच्या ढिगाऱ्यामागे काहीही असो, पण असं बोलणाऱ्या माणसांना काही वेदना आहे किंवा काही शल्य आहे यात कुठलीच शंका नाही. त्यानं ती माणसं त्यांच्या आतला आजार नम्रपणे समोर आणतात असंच मला वाटतं. सर्व विकार, सर्व आचार, सर्व दुःख, सर्व प्रकारच्या भावना या ज्या काही आपल्याला आहेत त्याचं प्रगटीकरण आपण आपल्या शब्दांमधून, शब्दफेकींमधून आणि देहबोलीतून देत असतो.
ते पाहत राहणं हा माझा सध्या छंद झाला आहे.
२३ । कार्यशैली