१२. वेठबिगारी:
माधवी ऑफिसमध्ये येते तीच मुळी उगवलेला हा दिवस कसातरी ढकलायचा या हेतूनंच.
ती येते तीच मुळी विलक्षण थकून-भागून. पहाटेपासून ती कामाला जुंपलेली असते. ऑफिसच्या
पायऱ्या चढते तेव्हा केव्हा एकदा आपण खुर्चीवर जाऊन आदळतो असंच तिला वाटत असतं.मग घड्याळाकडे बघत ती काहीतरी की-बोर्ड वाजवत टी टाइमपर्यंतचा वेळ कसातरी काढते. केव्हाही तिच्या टेबलापाशी गेलं की ती कॉम्प्युटरच्या डेस्कटॉपवर निरर्थक बघत बसलेली दिसते. निश्चल, मनात फक्त एकच घड्याळाचा काटा किती पुढे पळतो ते पाहणं.
माधवी काम करत नाही. दिवस, तास, मिनिटं आणि सेकंद ढकलत असते. तिला काहीही
करायचं नाही. तिला पुढं जायचं, जावंसं वाटत नाही. कामाच्या ठिकाणी तिला कुठलाही ओलावा वाटतो असं दिसत नाही. तिच्या मनात असतो फक्त रुक्ष व्यवहार. एक तारखेला मिळणाऱ्या रंगीत कागदाशी बांधलेला.
मला माधवीकडे पाहून नेहमी वाईट वाटतं. तिला करायचं नाही पण करावं लागतं अशा कठोर आणि क्रूर वेठबिगारीत ती जगतीय असं वाटतं. चैतन्यहीन, आनंदविहीन.
कार्यशैली । २०