८. चळवळ गुणवत्तेची
गोष्ट आहे १९४७ सालची. आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हाची. दुसरं महायुद्ध
नुकतंच संपलं होतं. जपान राखेतून उभं राहण्याचा प्रयत्न करत होता. त्या सुमारास जपानमध्ये जनगणना करण्यासाठी अमेरिकेनं एका तज्ज्ञाला जपानमध्ये पाठवलं. त्या माणसाचं किंवा तज्ज्ञाचं नाव होतं डब्ल्यू एडवर्डस् डेमिंग. त्यानं जपानमध्ये जनगणनेचं काम सुरू केलं पण त्याबरोबर त्यानं जपानच्या आर्थिक पुनर्रचनेसंदर्भातही लक्ष घालायला सुरुवात केली होती. त्याच संदर्भात १९४९ साली त्यानं जपानी इंजिनीअर्स आणि शास्त्रज्ञांसमोर एक व्याख्यान दिलं. असं म्हणतात की जपानच्या पुढच्या साऱ्या प्रगतीची बीजं त्या दिवशी तिथं पेरली गेली.
काय विषय होता डेमिंगच्या व्याख्यानाचा? विषय होता 'गुणवत्तेचा आग्रह - एक धोरण' एकूण पन्नास वयाच्या डेमिंगनं जपान्यांना गुणवत्तेचा संदेश दिला आणि सांगितलं की गुणवत्ता राखणं आणि वाढवत नेणं यामुळं अंतिमतः खर्चाची बचत होते, चुका कमी होतात, म्हणून पुन:पुन्हा काम करण्याची गरज भासत नाही. विलंब टळतो, त्यातून होणारा मनस्ताप वाचतो, कामगारांचं किंवा कार्यकर्त्यांचं मनोधैर्य शाबूत राहतं आणि वेळेचा व इतर साधनसामुग्रीचा अधिक चांगला उपयोग