पान:कार्यशैली.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०७. देऊया


 पॅट क्रोसच्या पुस्तकातलं एक वाक्य मनाचा छेद करून गेलं. त्यांनी लिहिलं आहे की, तुम्ही जे मिळवता त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन पूर्ण करता. पण तुमचं जीवन तुम्हाला उन्नत करायचं असेल तर तुम्ही इतरांना काय देता, हे महत्त्वाचं आहे.
 देण्यातून माणूस मोठा होतो. त्यामुळे देण्याची सवय अंगी बाणायला हवी. काहीही देण्याची, परतफेडीची किंवा दाद मिळण्याची कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण काय देऊ शकतो? चांगल्या सामाजिक कामाला पैसा तर देऊ शकतोच पण देण्यासाठी आणखीही खूप गोष्टी आहेत. कुणाला मदत करण्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊ शकतो. कुणासाठी तरी कष्ट करून श्रम देऊ शकतो. कुणाचं गान्हाणं ऐकण्यासाठी कान देऊ शकतो. थकलेल्या किंवा निराश झालेल्या कुणाला रडायला, विश्रांती घ्यायला खांदा देऊ शकतो. एखाद्या चांगल्या कामासाठी माणसं जोडून देऊ शकतो. आपली भावना देऊ शकतो.
 घ्यायला लागलं की सुचत जाईल आणि सुचायला लागलं की कृती होईल. घ्यायला हवं भरपूर

अन् अंतःकरणपूर्वक. पॅट क्रोसनं हे दिलं. आता आपणही इतरांना देऊ या.

कार्यशैली। १४४