७. काठोकाठ ऊर्जा
एका ऑफिसकडे आम्ही गेले महिनाभर पाहत आहोत. अगदी जवळून तिथं काम करणारी माणसं कधी येतात आणि कधी जातात याकडे लक्ष ठेवून आहोत. तिथं एकूण सोळा माणसं काम करत आहेत आणि पूर्ण आठ तास काम करावं अशी अपेक्षा आहे. येण्याची आणि जाण्याची वेळ लवचिक आहे. कुणी आठ वाजता येतं तर कुणी दहा वाजता, पण एक गडबड आहे.
जवळजवळ प्रत्येक जण साधारण दहा मिनिटं उशिरा येतो आणि जाण्याआधी साधारण अर्धा तास टंगळमंगळ करायला सुरुवात करतो. एक तर घरी जाण्याचे वेध लागलेले असतात आणि काम करण्याचा उत्साह किंवा शक्ती संपलेली असते. प्रत्येकी पाऊण तास गुणिले सोळा माणसं म्हणजे रोजचे संपूर्ण बारा तास. हे सर्व बारा तास त्या ऑफिसचे रोज केवळ टंगळमंगळीसाठी वाया जातात. म्हणजे दर महिन्याला सुमारे दीड पगार त्या ऑफिसकडून फुक्कट दिला जातो.
सुमारे महिनाभर अशी पाहणी केल्यावर आम्ही दोन गोष्टी ठरवल्या. दिवस कामानं काठोकाठ भरायचा आणि पूर्ण आठ तास काम करण्याइतपत ऊर्जा सर्वांनी मिळवायची अन् टिकवायची.
१३ । कार्यशैली