१००.कप करा रिकामा
एक फार सुंदर झेन कथा आहे.नान-इन ह्या नावाचा एक झेन गुरू जपानमध्ये राहत होता.त्याची गाठ घेण्यासाठी आणि झेन शिकण्यासाठी त्याच्याकडे एक प्राध्यापक आला.
नाना-इननं चहा केला.एक कप ओढला आणि त्या कपात तो चहा ओतू लागला.कप भरला
तरी नान-इन थांबेचना.कप भरला,बशी भरली आणि चहा टेबलावर सांडू लागला तरी नान-इनचं चहा ओतणं सुरूच राहिलं.
त्या प्राध्यापकाला राहावेना. तो म्हणाला, "एक कप पूर्ण भरला. आणखी कितीही भरलात तरी
काहीच शिरणार नाही आत."
"या कपासारखंच तुझं आहे."नान-इन ताडकन उद्गारला."तुझ्या डोक्यात कितीही तुझ्याच बन्याच कल्पना आहेत, मतं आहेत.तो कप तू रिकामा केलाच नाहीस तर मी तुला नवीन काय शिकवू."
आपलं सर्वांचं त्या प्राध्यापकासारखं आहे.आपल्याला ठाम कल्पना आहेत.श्रद्धा आहेत.मत-मतांतरं आहेत आणि असं असलं तरीदेखील आपण आपल्या कपात आणखी चहा ओतत राहतो.नवं नवं वाचत,शिकत राहतो.
तो कप आधी रिकामा करण्याचं पाहायला हवं.