पान:कार्यशैली.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९६. मूल्यव्यवस्था आणि कार्यशैली


 शिकागो विद्यापीठाचे प्राध्यापक श्रीयुत मिहाली सिकनटिहाली यांनी एक महत्त्वाचा अभ्यास नुकताच पूर्ण केला.त्यांनी तासन्तास अफाट एकाग्रचित्तानं चित्र रंगवत बसणान्या आणि शिल्प बनवत राहणाऱ्या कलाकारांच्या कार्यपद्धतीचा अत्यंत सखोल असा अभ्यास केला.या मिहालीबाबूंचा एकच प्रश्न होता, की अशी काय गोष्ट असते की ज्यामुळे हे कलाकार तहान-भूक आणि आसपासचं सारं जग विसरून काम करत राहतात, तासन्तास अन दिवसेंदिवस.

 सुमारे तीन वर्ष सतत अभ्यास करून शिकागो विद्यापीठाच्या या मिहालीबाबूंनी 'प्रवाह (फ्लो)' या नावाची एक संकल्पना शोधून काढली. प्रवाह म्हणजे तुमच्या समोर असलेल्या आव्हानाचा आणि तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा सुंदर मिलाफ.असं आहे, की आपल्यालाच ज्या क्षेत्रात गती आहे, ज्या क्षेत्रात आपल्याकडे विशेष कौशल्यं आहेत, त्याच क्षेत्रात आपल्याला काही अतिउत्तुंग आव्हानं उभी राहिली तर आपण अक्षरशः सारं सारं विसरून कामाच्या प्रवाहात सर्वस्व झोकून देतो.जसं एखाद्या चित्रकाराला एखादा विषय भिडतो आणि तो विषय त्याच्या प्रतिभेला आव्हान देतो तसं.

कार्यशैली। १३०